रविवार, १४ मे, २०२३

ठाकर आदिवासी कला आंगण

ठाकर आदिवासी कला आंगण...
मध्यंतरी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे असलेल्या या संग्रहालयाबद्दल वाचले होते. योगायगाने गेल्याच आठवड्यात आम्ही सावंवाडीला गेलो तेंव्हा तिथून हे संग्रहालय फक्त २० किमी वर आहे असे समजले आणि आम्ही मुद्दाम वेळ काढून इथे भेट द्यायचे ठरवले.
येथील ठाकर आदिवासीसमाजाने निरनिराळ्या अकरा लोककला आणि ठाकर जमातीच्या पारंपारिक कलाप्रकारांचे जतन आणि संवर्धन केले आहे.
यामध्ये चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, चामड्याचे कठपुतळे, पांगुळ बाळ, पोवाडा, गोंधळ, राधानृत्य आणि ठाकरांच्या आणखी सहा पारंपारिक कला प्रकारांचा समावेश आहे.
श्री.परशुराम विश्राम गंगावणे हे 1975 पासून आदिवासी ठाकर जमातीच्या पारंपारिक कलाप्रकारांचे जतन आणि संवर्धन करत आहेत. त्यांच्या या कार्याची भारत सरकारने दखल घेऊन त्यांना २०२१ मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित केले.
त्यांचा मुलगा चेतन गंगावणे याने ही परंपरा जतन केली आहे. त्यासाठी त्यांनी Thakar Adivasi Kala Aangan, Museum & Art Gallery निर्माण केली आहे.

कलाप्रेमींनी या उपक्रमास भेट देऊन त्यांना प्रोत्साहित करावे.
www.pingulichitrakathiart.com
-  हेमंत पुरोहित.

   

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

कोव्हीडचे तेरावे...

नमस्कार मंडळी !!!
आज आमच्या कोव्हीडचे तेरावे.. म्हणजे अक्षरशः तेरावा दिवस. मी गंम्मत म्हणून तेरावा दिवस म्हणतो कारण आज आम्हाला +ve होऊन तेरा दिवस झाले. साधारण पणे पहिल्यांदा कोव्हीड +ve आल्यावर पहिले काही दिवस खरोखरच मानसिक  व शारीरिकदृष्टीने  क्लेशदायी होते. पण कोव्हीड झालेल्या प्रत्येक व्यक्तीला यातून जावेच लागते. फरक एव्हडाच असतो की एरवी तेरावे एखाद्या जवळचा माणुस गेल्यावर असते व  हा तेरावा दिवस म्हणजे आमच्यातुन कोव्हीड व्हायरस पूर्णपणे गेल्यानिमित्ताने आहे. 

एकदा का तेरावा -चौदावा दिवस झाला की खऱ्या अर्थाने आमचे सुतक संपेल.  
खरंच सुतकच म्हंटले पाहिजे आपल्याला कोणी शिवायचे नाही आपण कोणाला भेटायचे नाही. कोणी काही आणले तरी आपल्या स्पर्श होणार नाहीं असें चार हात लांब ठेवायचे. बाहेर कुठे जायचे नाही.  खरोखरच या आजाराने एकप्रकारे तेरा दिवसांचे सुतकच लागले होते. लोकांमध्ये असूनही आपण कुठेतरी एकाकी होतो. कारण या फेज मधून तुम्हाला एकट्यानेच जायचे असते.

पण एक गोष्ट या काळात आम्हाला कळली की आपल्याला काहीही  झाले तर आपल्याला धीर द्यायला,  मदत करायला असंख्य हात पुढे येतात.
आप्त स्वकियांचे,  मित्र मंडळींचे आपुलकीने - काळजीने फोन करणे. काही हवं नको विचारणे हे सर्व पाहून नकळत मनात आपण आयुष्यात खूप काही कमावलं असल्याचे समाधान मिळते. 

बघता बघता आमचे Home Quarantine चे सतरा दिवस पुढील चारपाच दिवसात संपतील आणि आम्ही परत नवीन उत्साह व नवीन जोशात एका नवीन आयुष्याची सुरवात करू. 

आमच्या या कठीण काळात आम्हाला सर्वतोपरी मदत केल्या बद्दल व वेळोवेळी धीर दिल्याबद्दल आमच्या सर्व मित्र परिवार, शेजारी, ऑफिस मधील सहकारी, आमचे डॉक्टर आणि सर्व नातेवाईकांना मनापासून  धन्यवाद. 🙏🙏🙏

-- हेमंत आणि सरिता. 

कोव्हीड... अचानक आलेला पाहुणा.

Hi all, 
आम्हाला दोघांना गेल्या रविवारी (13 September) covid +ve डिटेक्ट झाला. खरंतर त्या आधीच म्हणजे आधीच्या रविवारी मला एकदा ताप आला होता पण तो आम्हाला नॉर्मल वाटला होता व क्रोसिनने गेलापण.
त्यामुळे विशेष दाखल घेतली नाही.  एक सेकंड ओपिनियन  म्हणून आमच्या फॅमिली डॉक्टरनाही दाखवले त्यांनीही सर्व चेक केले व सर्व नॉर्मल असल्याचे सांगितले. तरीही precaution म्हणून मी दर दोन तासांनी ऑक्सिजन व तापाची नोंद लिहू लागलो.
बाहेर सर्व वातावरण कोव्हीडमय असल्यामुळे 
 मी व सरिता घरीच थांबलो व बाहेर कोणाबरोबर संपर्क टाळला.. घरी कामवाली नसल्याने बाहेर च्या कोणाचा वावरही नव्हता. 

अशातच परत चार पाच दिवसात म्हणजे शनिवारी मला परत 100पर्यंत ताप आला व हिला सर्दी झाली मग आम्ही टेस्ट करून घ्यायची ठरवली. 
मनात जरा धाकधूक होती पण मनाची तयारी केली व निश्चिन्त मनाने आम्ही covid सेंटर मध्ये गेलो.  सर्व प्रथम तिथली स्वच्छता,  व्यवस्था आणि सोय पाहूनच आम्ही खूप रिलॅक्स झालो. 
मला ताप असल्यामुळे माझी रॅपिड अँटीजेन टेस्ट घेतली तर सरिता ची स्वॅप टेस्ट घेतली आणि माझा लगेचच result समाजला व सरिताचा दुसऱ्या दिवशी. 
एकदा का पॉसिटीव्ह रिपोर्ट आल्यावर पुढची सूत्र वेगाने फिरली गेली.  या बाबतीत आमचे डॉक्टर Dr. Rahul Borkar  यांचे आम्हाला खूपच चांगले मार्गदर्शन लाभले.  त्यांनी आम्हाला लगेचच  व्हाट्सअप वर औषधं पाठवली,  तसेच Govt of Goa  Health Dept ची होम आयसोलेशन च्या परवानगी ची लिंक पाठवली व सर्व प्रथम Home Quarantine साठी अँप्लिकेशन अपलोड करायला सांगितला. एकीकडे मी आमच्या सोसायटी कमिटी व इतर मेंबर्सना आम्ही पॉसिटीव्ह असल्याचे कळवले. संध्याकाळपर्यंत कलेक्टर ऑफिस मधून रीतसर Home Isolation Permission चे सर्टिफिकेट मेल वर आले आणि खऱ्या अर्थाने आमची Covid Journey चालू झाली. 
खरेतर त्याच रात्री आमची रागिणी जर्मनीला चालली होती.  तिला आणि तिच्या घरच्यांना  आम्ही पहिल्या पासून ह्याची कल्पना दिली होती.  तरीही ह्या तिच्या जर्मनीला जाण्याच्या चांगल्या बातमी समोर आम्ही आमची covid ची बातमी मुद्दामून कोणा नातेवाईकांना सांगितली नाही. 
नंतरचे चार दिवस म्हणजे अगदी गेल्यावर बुधवार पर्यंत मला रोज एकदा किंवा दोनदा 100 पर्यंत ताप येत होता.  त्यामुळे आम्ही आणि जास्त काही इन्फेकशन नाही ना हे पाहण्यासाठी Inflammatory Marker Panel  Test आणि इतर काही  blood tests करायच्या ठरवल्या. जरा काळजी वाटत होती.  पण मुख्य म्हणजे या इतक्या दिवसात आम्ही मनातून खूप खंबीर होतो आणि अजिबात घाबरलो नव्हतो.  काय असेल  त्याला हसत खेळत सामोरे जायचं असे ठरवलं. Test Reports अपेक्षे प्रमाणे  जरा Inclined होते पण डॉक्टर म्हणाले की सर्वसाधारणपणे असेच results येतात. रिपोर्ट आल्यावरवर पुढची टेस्ट म्हणजे HRCT स्कॅन - थोडक्यात फुफुसांना काही इन्फेकशन नाही ना हे पाहण्यासाठीची ही टेस्ट. त्यात सरिताचा स्कोर 5 म्हणजे माईल्ड व माझा 8 म्हणजे बॉर्डरवर आला.  डॉक्टरांनी काळजी करण्यासारखे नाही म्हणून सांगितले व आहे तोच औषधांचा कोर्स चालू ठेवला. गंम्मत म्हणजे HRCT केल्या दिवसापासून माझा ताप गेला.  गेले तीन दिवस झाले आम्हाला एकदाही ताप आला नाही. त्यामुळे आज आम्ही आमच्या नातेवाईकांना सांगण्याचे ठरवले. 
या काळात आम्हाला माझे ऑफिसचे सहकारी,  मित्र व आमच्या सोसायटीतील मेंबर्स यांची खूप मदत झाली. 
एक आठवडा पटकन गेला.. अजुन दोन -तीन दिवसात जरुरी भासली तर आणखी एक टेस्ट रिपीट करू. 

काळजी करू नये... By next week we will be back with Bang!!!

-- हेमंत आणि सरिता. 

रविवार, ५ एप्रिल, २०२०

बार्बेट पती-पत्नी

मध्यंतरी आमच्या एरियात एक पाहुणा आला. सकाळी सकाळीच  एक दोन फेऱ्या मारून  गेला. बहुदा घराच्या शोधात होता तो. सुरवातीला  एकटाच होता. दोन तीन दिवस त्याने  अशाच चकरा मारल्या.. आणि एक दिवस तो तिला घेऊन आला. आमचं कुतूहल वाढले.. त्यांच्या एकंदर हालचाली वरून आम्हाला एक गोष्ट कळली कि हे आमच्याच भागात राहायला आले आहेत. तो जणू शिफ्टिंग च्या गडबडीत होता आणि  ती एखाद्या गृहिणी प्रमाणे या भागात पाणी व्यवस्थित आहेना, खाण्यापिण्याच्या वस्तू,  मार्केट,  गिरणी वगैरे जवळ आहेना,  अश्या  तिच्या गरजेच्या गोष्टी जवळपास मिळतायतना याची चाचपणी करत होती. एकंदरीत पुढच्या चार पाच दिवसात हे  जोडपे नवीन घरात, आमच्या एरियात रुळले.

आमच्या स्वभावानुसार,  आमच्या मनात ह्यांचे नाव काय? कुठून आले?  दोघेच आहेत  कि आणखी कोणी आहे बरोबर? आमच्या भागात एक्झॅटली  कुठे राहतात? वगैरे वगैरे असे एक नाही अनेक प्रश्न होते. पण विचारायचं कोणाला?  कारण जे जोडपं आमच्या भागात राहायला आले होते ते आपल्यातले  कोणी नसून एक छानशी पक्षांची जोडी होती. मळकट पोपटी - हिरव्या रंगाची हि पक्षांची जोडी नकळत आमच्या रोजच्या रुटीन मध्ये एक नवीन उत्साह घेऊन आली.
अजून त्यांचे नाव कळलं नसल्याने ती एक उत्सुकता अस्वस्थ करीत होती. त्यामुळे आम्ही लगेच गूगलबाबा, आमचे  सोशल ग्रुप्स - बर्डस  ऑफ गोवा किंवा वाइल्ड लाईफ ऑफ गोवा वगैरे  इथे मिळेल तेव्हढी या पक्षांबद्दल माहिती गोळा केली. शेवटी त्या पक्षाचे नाव कळले.. त्याचं नाव होते बार्बेट.. white cheeked Barbet, मराठीत त्याचे नाव तांबट असे आहे. मला आणि माझ्या बायकोला बार्बेट हे नाव खूप आवडले. त्यादिवसा पासून आम्ही त्यांना बार्बेट पती-पत्नी असे गमतीने म्हणू लागलो.
खरंतर याच दिवसात आम्हाला एका वेगळ्याच पक्षाचा आवाज ऐकू येत होता.  कूटूररर... कूटूररर (cooturrr) असा आवाज ऐकू यायचा आणि थोड्यावेळाने त्याला प्रतिसाद मिळायचा.  आम्ही अंदाज बांधला कि हा ह्याचाच आवाज असावा. एकदा नाव कळले कि आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल एक ओळखीची, आपुलकीची भावना  निर्माण होते. आमचं तसंच झालं. त्यामुळे  गुगलवरून आवाज तपासाला तर तो बार्बेटचाच निघाला.

मग आम्ही त्यांचे घरटे कुठे आहे त्याचा शोध घेऊ लागलो. पण नेट वरच्या माहिती वरून कळले के हे पक्षी घरटे बांधत नाही तर एखाद्या झाडाच्या मृत फांदीला मोठे भोक पडतात अगदी बिळा प्रमाणे आणि त्यात राहतात. आमच्या आजूबाजूच्या झाडांचे निरीक्षण करत असताना आम्हाला किचनच्या ग्याल्लरीतुन  सप्तपर्णीच्या झाडाची एक जराशी वाळलेली फांदी दिसली आणि त्यावर एक बिळासारखं भोकही दिसलं. भोक जरा लहानच वाटत होते. भोक मिळाले याचा आम्हाला आंनद झाला खरा पण  जोपर्यंत बार्बेटला त्यात जाताना पाहत नव्हतो तोपर्यंत ते त्याचेच घर आहे याची खात्री पटत नव्हती. त्यामुळे आता आम्हाला नवीनच नाद लागला कि जेव्हा जेव्हा बार्बेट पती-पत्नी दिसले कि ते कुठे जातात  किंवा त्यांचा आवाज ऐकू आला कि तो कुठून येतोय त्याचा मागोवा घेऊ लागलो आणि एका वेळी एक बार्बेट त्या घरात शिरताना पाहिला आणि आमची खात्री पटली कि ते घर त्यांचेच आहे. आमची दोन तीन दिवसांची तपश्चर्या  फळाला आली. 
जसजशी बार्बेट पती-पत्नींबद्दल जास्त माहिती मिळत गेली तसतशी त्यांची ओळख आम्हाला जास्त घट्ट होत गेली. 
त्यांचा आवाजाची  आता आम्हाला चांगलीच सवय झाली.जसजसें  दिवस जाऊ लागले तसतसें यांच्या ओरडण्याचा आवाज मोठा होत  होता. त्यांच्या घरट्यावरच्या चकरा पण आता वाढल्या होत्या.तिथूनच थोड्या अंतरावर एक पपईचे व फणसाचे झाड होते. पिकलेल्या पपया आणि फणस हे यांचे आवडते खाद्य. या दोन झाडांवर बार्बेट पती-पत्नींच्या दिवसभर असंख्य चकरा होत असत.
बिळाजवळ आले कि एक जण आत जायचा तर एक बिळाबाहेर थांबायचा..नवीन खाद्य शोधायचा. खाण्यापिण्याची काही कमी नव्हती.

एव्हाना आम्हाला जाणवले होते कि बार्बेट पती-पत्नींनी आत अंडी घातली आहेत आणि आलटून पालटून दोघे दिवसा अंडी उबवण्याचे काम करतात. यांच्या विषयी आणखी माहिती काढतांना असे कळले कि हे साधारणपणे डिसेंबर ते मे -जून पर्यंत एकमेकां सोबत जोडीने असतात. त्यांच्या कूटूररर... कूटूररर (cooturrr)असा ओरडण्याच्या आवाजाची तीव्रता त्यांचा एकत्र येण्याच्या काळात खूप वाढते. नंतर नंतर म्हणजे अंडी उबवण्याच्या काळात वा पिल्लं अंड्यातुन बाहेर येण्याचा काळात त्यांच्या आवाजाची तीव्रता कमी होत जाते.
त्यांना त्यांचे घरटे करायला - म्हणजे  झाडावर बिळ खोदायला साधारण वीस दिवस लागतात. त्यांना पाहिजे तसे बिळ तयार झाले कि तीन चार दिवसातच ते अंडी घालतात. सर्व साधारण  पणे हे पक्षी  एका वेळी  दोन किंवा तीन अंडी घालतात. दिवसा दोघेही अंडी उबवतात पण रात्री मात्र हे  काम फक्त मादीच करते. चौदा-पंधरा दिवसात अंडी पूर्ण तयार होऊन पिल्लं बाहेर येण्यासाठी तयार होतात.
आम्ही दोघे या बार्बेट पती-पत्नींच्या इथपर्यंतच्या  सहजीवनाचे नकळतच साक्षीदार झालो होतो. आता पुढे काय...?   हे मानवी स्वभावा प्रमाणे कुतूहल होतेच.  बिळात अंडी आहेत याची खात्री होती पण आतले काही दिसत नसल्याने पिल्लांबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली होती. काहीनाकाही कारण काढून आम्ही किचनच्या ग्याल्लरीत जायचो आणि बिळातून कोणी बाहेर डोकावतोय का ते पहायचो. 
दोन तीन दिवस असेच अस्वस्थतेत गेले...आणि तो क्षण आला. ज्याची आम्ही एवढे दिवस वाट पाहत होतो तो क्षण आला. त्या बिळातून एक कोवळी चोच बाहेर डोकावताना दिसली. थोड्या वेळाने दोन चोची दिसल्या आणि परत आत गेल्या. आमची खात्री पटली..आत मध्ये दोन पिल्लं असल्याची शुभवार्ता समजली.

                   
काही महिन्यापूर्वी आमच्या इथे रहायला आलेले हे बार्बेट पती-पत्नी आता दोन गोंडस पिल्लांचे आई-बाबा झाले होते.


सोमवार, ३० मार्च, २०२०

प्रवास

प्रवास 
प्रवासाची आवड मला लहानपणापासूनच होती. पूर्वी जास्तकरुन रेल्वे किंवा बसचा प्रवास असायचा. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेबरोबरच लोक विमानाने प्रवास करायला लागले तर बसऐवजी काहीजण स्वतःच्या गाडीने प्रवास करणे पसंत करु लागले.
प्रवास कुठलाही असो प्रत्येक वेळी एक वेगळा अनुभव, एक वेगळा आनंद देऊन जातो.
मला स्वतःला निरनिराळ्या नवीन ठिकाणी फिरण्याची खूप आवड आहे आणि मुख्य म्हणजे ड्राइव्हिंगची खूप आवड आहे  त्यामुळे कितीही लांबचा प्रवास असो मी स्वतः ड्राईव्ह करायला कधीही तयार असतो.
इतके वर्ष गाडी घेऊन निरनिराळ्या ठिकाणी भटकताना  मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे प्रवासात येणारे अनुभव आणि आपल्या आयुष्यात येणारे अनुभव यात कमालीचे  साम्य आहे.
खालील लेखामध्ये मी हे माझे अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला  आहे.--
मुळातच कुठलेही वाहन चालवायला  शिकणे म्हणजे अगदी लहानमुलाने चालायला शिकण्यासारखे असते. तो चालायला शिकताना धडपडतो, आपटतो कधी कधी लागते सुद्धा..  पण एकदा  मात्र त्याला स्वतः कोणाचही आधार न घेता उभे राहून एक एक पाऊल पुढे  टाकून चालण्याचा कॉन्फिडन्स आला की त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह काही विचारू नका. जवळपास तोच उत्साह,  आनंद मला नेहमी नवीन  गाडी शिकणार्यांमध्ये  दिसतो.
जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या शहरांत गाडी चालवता तोपर्यंत तुम्ही शाळेतील मुलांसारखं protected आयुष्य जगत असता पण तुम्हाला खरी कॉम्पिटिशनची जाणीव होते ती तुम्ही आपल्या शहाराबाहेर गेल्यावर. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा  highway वर जाता तेव्हा तुमची अवस्था एकदम शाळेतून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेल्या मुलांसारखी असते. Highway वरचा झगमगाट, इतर गाड्यांचे  स्पीड पाहून आपण कॉलेजमध्ये नवीन ऍडमिशन घेतलेल्या मुलासारखं बावरून जातो. कॉलेजमध्ये सिनियर मुलामुलींचे कपडे, त्यांचे बिनधास्त वागणं, त्यांची स्टायलिश लाईफस्टाईल पाहून एखाद्या साध्या मुलाला जसा इंफेरीयॉरिटी कॉम्प्लेक्स येतो तसेच काहीसे ह्या नवख्या ड्राइव्हरचे पहिल्यांदा हायवेवर आल्यावर होते. इतके दिवस त्याला वाटत असे की आपलीच गाडी गावात बेस्ट आहे म्हणून पण इथे आल्यावर तर एका हुन एक नवंनवीन गाड्यांची मॉडेल्स पाहायला मिळतात.तो नवखा ड्राइवर बिचारा एक लेन (बऱ्याचदा चुकीची )पकडून गाडी चालवू लागतो. जरा इकडे तिकडे झाल्यास आजूबाजूच्या लेन मधून सिनियर्स जोर जोरात हॉर्न वाजवून स्पीडने ओव्हर टेक करत निघून जातात. त्यातून परत बरोबर आई वडील,किंवा बायको यांचे सततचे काहींना काही सल्ले चालूच असतात त्यामुळे तो आणखीच गोंधळलेला असतो. हळूहळू 
काही दिवसात मुलगा जसा कॉलेजमध्ये रुळतो तसा हा नवखा ड्राइव्हर सुद्धा हायवेच्या ड्रायव्हींग मध्ये सराईत होतो.

रस्त्यावर एकाच वेळी अनेक गाड्या धावत असतात. खरं तर प्रत्येक गाडीचा स्पीड तिच्या इंजिनच्या ताकदीनुसार व  ड्राइव्हरची इच्छाशक्ती व चालवण्याचे कसब यावर अवलंबून असतो. आपलेपण तसेच असते. काही मुलं खूप हुशार असतात काही एव्हरेज असतात तर काही स्लो असतात. पण प्रत्येक जण आपापल्या परीने शिकत असतो..पुढे जात असतो.

मोठया गाड्यांचा स्वभाव म्हणजे शाळेतील एखाद्या हुशार मुलासारखा असतो. एखाद्या परीक्षेत दुसऱ्या ऍव्हरेज मुलाला कधी चार पाच मार्क्स जरी जास्त मिळाले कि हा हुशार मुलगा जसा अस्वस्थ होतो आणि मीच खरा हुशार आहे म्हणून त्या बिचाऱ्या ऍव्हरेज मुलाच्या पुढे जाण्यासाठी जसा आटापिटा करतो तसेच काही ह्या मोठया गाडीवाल्याचे असते. खरे तर एखाद्या छोटी गाडीने कधी तरी धीर करून एखाद्या मोठया गाडीला ओव्हर टेक केले  तरी तिला पण माहित असते की आपल्याला जास्त वेळ पुढे राहता येणार नाही म्हणून, कारण तेव्हडी ताकदच नसते. तरी मला ओव्हरटेक कसे केले म्हणून मोठीचा इगो दुखावतो आणि तो भन्नाट वेगाने, मोठ्याने हॉर्न मारत त्या छोटया गाडीला घाबरवत ओव्हरटेक करून निघून जातो.

स्पीड ऑफ द बॉस इज स्पीड ऑफ ऑर्गनायझेशन -- बऱ्याच वेळा ऑफिस मध्ये आपला बॉस किंवा टीम लीडर खूप स्लो डिसिजन मेकर असतो किंवा तो लीडर बनायला योग्य नसतो. त्याच्यामुळे अख्या टीमची किंवा ऑर्गनायझेशनची प्रोग्रेस मंदावते.अशावेळी टीममधील एखादा ऍग्रेसिव मेंबर बंड करतो आणि सगळी सूत्रे स्वतःच्या हातात घेतो व काही दिवसातच पूर्ण ऑर्गनायझेशनला एक नवीन गती प्राप्त होते. अगदी याचाच प्रत्यय हायवे वरती ड्रायव्हिंग करताना येतो. बरेचदा आपल्यापढे बऱ्याच गाड्यांची रांग हळूहळू पुढे सरकत असते, रांगेतील सर्वच गाड्या एका संथ गतीने पुढे चालललेल्या असतात. आपण एवढ्या स्लो का चाललोय हे बराच वेळ कोणालाही कळत नसते कारण पुढचा स्लो आहे म्हणून मागचा स्लो चालवत असतो. अशा वेळी मध्येच एखादी गाडी धाडस करते आणि पुढच्या गाड्यांना ओव्हरटेक करत पुढे जाते. मागच्या गाड्या त्या गाडीला फॉलो करतात आणि ऑटोमॅटिक सगळ्यांचा स्पीड वाढतो. पुढे गेल्यावर कळतं की ज्या गाडीमुळे आपण सर्व एवढे स्लो चाललो होतो तो एक छोटासा टेम्पो होता. तो स्लो चालला होता त्यामुळे त्याच्या गतीने मागच्या सर्व गाड्या त्याला फॉलो करत होत्या.

बऱ्याच वेळा रस्ता छान मोकळा असतो आपणही आनंदात ड्रायविंग करत असतो आणि अचानक समोर ट्राफिक जाम दिसतो. काही मोठे ट्रक्स, कंटेनर्स दाटीवाटीने गर्दी करून चाललेले असतात. अचानक आलेल्या ह्या जाम मुळे आपण लगेच uneasy होतो, चीडचड करतो. उगीचच  हॉर्न मारतो,  रॉंग साईड ने पुढे जायचा प्रयत्न करतो. पुढील काही वेळातच पुढचे दोन कंटेनर्स डिझेल भरायला वळतात, एक दोन ट्रक्स सायडिंगला थांबतात आणि रस्ता हळुहळु मोकळा होतो.आपल्या आयुष्यातही असेच घडते... वाईट काळ येतो सर्व काही ठीक चाललं असताना अचानक अडचणींचे डोंगर उभे राहतात,  खरं तर तो एक काळ (phase ) असतो त्यातून सर्वांना जावच लागतं. परंतु त्याला सामोरे जायच्या आधीच काहीजण निराश होतात,  हताश होतात. खरेतर धीराने या काळाला सामोरे गेलात तर हळू हळू सर्व प्रॉब्लेम्स सुटत जाऊन सर्व काही सुरळीत होते.

ह्या प्रवासात मला आणखी एक साम्य आढळले ते म्हणजे मोठ्या प्रवासात काही गाड्या खूप काळ आपल्या मागे पुढेच किंवा बरोबर असतात.. नकळत आपलं एकमेकांशी एक मूक नातं तयार  होतं अगदी एखाद्या मित्रा बरोबर किंवा कॉलेज मधील मैत्रणीबरोबर असते तसेच. ह्या गाड्यांमध्ये पण एक प्रकारचा बॉण्ड निर्माण होतो. एखादी  खूप पुढे गेली किंवा बराचवेळ दिसली नाही तर ती कुठे गेली असेल अशी मनात चुटपुट लागून राहतें...आणि पुढे ती (गाडी )परत दिसली की नकळत मनातल्या मनात बरे वाटते.
अगदी काहीवेळा असाही अनुभव येतो एखाद्या दुसऱ्या राज्यात आपल्याला आपल्या राज्याच्या रेजिस्ट्रेशन ची गाडी दिसते आणि क्षणभर का होईना आपल्याला आपला गाववाला भेटल्याचा आंनद होतो.
बऱ्याचदा ह्या गाड्या म्हणजे आपल्या वर्गातल्या मित्रांप्रमाणे असतात. शेवटच्या वर्षापर्यंत एकत्र मजा करतात आणि शिक्षण पूर्ण  झाले की सर्वजण कॅरिअर करण्यासाठी निरनिराळ्या शहरात, देशात जातात...व नंतर त्याची पुढे भेट पण होतं नाही तसंच काहीसे ह्या बरोबरच्या साथीदार गाड्यांचे असते. एखाद्या गावापर्यंत, एखाद्या जंक्शन पर्यंत या पाच सहा तास एकत्र असतात नंतर निरनिराळे रस्ते पकडतात आणि पुढच्या प्रवासात कुठे भेटतही नाहीत.

प्रवास आणि आयुष्याचा प्रवास आपल्याला प्रत्येकवेळी एक नवा अनुभव देऊन जातो..त्यातुनच आपण नवीन काहीतरी शिकतो आणि त्याच्या जोरावर पुढच्या प्रवासासाठी जोमाने तयारी करतो.



बुधवार, २५ मार्च, २०२०

मी साधु झालो...

मी साधु झालो... 

आजचा दिवस चांगलाच गडबडीत गेला.. आज महाशिवरात्र होती. दिवसभर  आमच्या  सुपेगावच्या महादेव मंदिराच्या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रात्रीचे बारा वाजून गेले होते.  मंदिराच्या आवारातली वर्दळ आता बरीच कमी झाली होती. काही ठिकाणी स्टॉलवाले आवरा आवारी करत होत. एकदोन चहाच्या टपऱ्यातुन अजूनही स्टोव्हचा आवाज येत होता. देवळासमोरच्या पानाच्या ठेल्यावर पाचसहा जण तंबाखू मळत व बीडीचा  आस्वाद घेत निवांत गप्पा मारत बसले होते. लांबवर कुठेतरी कुत्री भुंकत होती.
मी एका अंधाऱ्या खोलीत खाटेवर आंग टाकले होते. झोपायचा प्रयत्न करत होतो पण झोप येत नव्हती. सर्वांगाला विभूती, राख, हळद, धूप यांचा सम्मिश्र वास येत होता. खालच्या खाटिच्या पट्ट्यांबरोबर मला माझे जानवे, रुद्राक्षाची माळ चांगलीच टोचत होती. माझ्या खोलीत आणखी दोन साधु होते. माझ्यापेक्षा लहान त्यागराज मोबाईलवर पिक्चर पहात पडला होता तर शांतीभूषण माझ्यापेक्षा सात आठवर्षांनी मोठा एका कोपऱ्यात बिड्यांचा धुर काढत बसला होता. बाहेर गारवा असूनही खोलीत खूप गरम होत होते. मला झोप आजिबात लागत नव्हती.
मनाविरुद्ध माझ्यातला एक मी मला माझ्या भुतकाळात घेऊन जात होता.आजच्या दिवशी मला घर सोडून जवळपास सोळावर्ष झाली.
मी साधारण १८-१९ वर्षाचा होतो. घरी आम्ही तीन भावंडांपैकी मी लहान. आई लहानपणिच गेली होती. वडील गावच्या देवळात पुजा करायचे आणि ज्योतिष सांगायचे. त्यामुळे लहानपणापासूनच आरत्या, पूजेतील मंत्र मला बऱ्यापैकी पाठ होते.पंचांग पहाणे, पत्रिका मांडणे वगैरे मला थोडेबहुत जमत होते.
माझे दोन्ही भाऊ माझ्यापेक्षा तीनचार वर्षानी मोठे होते. मधला भाऊ बारवी नंतर एका दवाखान्यात कंपाउंडर म्हणून काम करत होता तर मोठा तालुक्यातील कॉलेज मध्ये D.Ed. करत होता. मला मात्र अभ्यासात आजिबात रस नव्हता. अकारावी नंतर मी शाळा सोडून दीली होती आणि दिवसभर कधी देवळात तर कधी bus stand किंवा नाक्यावरील टपरीवर उनाडक्या करत फिरायचो. सुरुवातिला लहान म्हणून कोणी काही बोलले नाही पण नंतरनंतर मात्र या कारणांसाठी आमच्यात वादविवाद - भांडणे होऊ लागली. शिक्षण सोडलेले आणि कमावत काही नाही यामुळे माझ्याबद्दल आमच्या घरी,शेजाऱ्यांकडे तसेच नातेवाईकांमध्ये मी म्हणजे एक वाया गेलेला मुलगा अशी एक प्रतिमा झालेली. हळूहळू माझे घरच्यांबरोबर खटके वाढू लागले. जेवणाखाण्यासाठी कधी कोणी नाही म्हटले नाही पण मला खर्चासाठी पैसे मिळणे बंद झाले. सुरवातीला काही टवाळ मित्र होते ते सुद्धा हळूहळू कोणी collage कोणी नोकरी- व्यवसायात स्थिरावले आणि तेही माझ्यापासून नकळत दूर गेले.पानाची टपरी, तो बस स्टॅंड या सगळ्या नेहमीच्या ठिकाणी मला एकटेपणा - परकेपणा जाणवू लागला. स्वतःमध्ये पहिल्यांदाच एक उपेक्षित असल्याची भावना निर्माण झाली.
नाही म्हटले तरी मधल्या काळात मी कधी गॅरेज मध्ये तर कधी बस स्टॅंडवरील हॉटेल मध्ये छोटीमोठी कामे केली पण कधी स्थीरावलो नाही. असेच दिवस जात होते.. माझा मोठा भाऊ DEd झाला आणि त्याला तालुक्यातील शाळेत नोकरी लागली. मधल्या भावाने देखिल त्यांच्याच दवाखान्यात काम करणाऱ्या नर्स बरोबर लग्न करून संसार थाटला. माझा  एकटेपणा आणखीनच वाढला. मी जास्तवेळ घराबाहेरच घालवू लागलो.
एक दिवस गॅरेज मध्ये बसलो असताना एक ट्रक सर्व्हिसिंग करता आला. मी तीथे बेकारच बसलो होतो म्हणून दादु मॅकेनीकच्या मदतीला लागलो. पाचसहा तास मन लाऊन काम केले,  वेळ कसा गेला कळलेच नाही. ट्रक ड्रायव्हर बच्चूसिंग माझे काम बघून एकदम खुश झाला. मला म्हणाला येतोस का गाडीवर .. दिवसाला १०० रुपये भत्ता व  दोन वेळचे जेवण- नाष्टा मिळेल. अचानक असे विचारल्या मुळे क्षणभर काय करावे सुचलेच नाही. इतक्या वर्षात पहिल्यांदी माझ्याकामावर कोणीतरी खुष झाले होते आणि समोरून मला काम देत होते. दादू मॅकेनीक तर माझ्या कडून नेहमी नुसता काम करून घ्यायचा पण त्यानी  कधी माझ्या कामाचे कौतुक केले नाही आणि पैसे तर कधीच दिले नाहीत. महीन्याला तीनएक हजार रुपये दोन वेळचे जेवण आणि ट्रक मधून निरनिराळ्या प्रदेशात फिरायचे आणि बच्चूसिंगला क्लिनर म्हणून मदत करायची या अचानक आलेल्या संधीमुळे मी एकदम हुरळुन गेलो. बच्चूसिंगनी मला सकाळपर्यंत कळव म्हणून सांगितले आणि तो गावातल्या साखर कारखान्यात माल भरायला निघून गेला.
मी खूप बेचैन झालो .. संध्याकाळचे सात वाजून गेले होते. मी घरी आलो वडील घरीच होते वाहिनीची हॉस्पिटल मध्ये सेकंड शिफ्ट होती त्यामुळे ती नव्हती. भाऊ आठ वाजता आला. जेवताना खूप उत्सहात मी मला मिळालेल्या नवीन संधी बद्दल सांगितले. माझी आगदी खात्री होती की ही बातमी ऐकून दोघेही एकदम खूश होतील. पण झाले भलतेच.. वडिलांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि एकदम कडू तोंड करून ते माझ्यावर फिस्कारले  व म्हणाले देवळातल्या पुजाऱ्याचा मुलगा आणि ट्रकवर क्लिनर म्हणुन काम करणार?  लाज वाटत नाही...आरे  लोकांनी विचारले तर काय मुलगा क्लिनर म्हणून काम करतो म्हणून सांगू?  मला हे आजिबात पसंत नाही असे ठणकावून सांगितले... वडिलांचा नकार ठाम होता.  भावाने पण मला support केला नाही. रात्रभर मी विचार करत काढली. आणि शेवटी ठरवले की आलेली संधी सोडायची नाही आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मी कोणालाही न कळवता घर सोडले.... कायमचे.
एव्हढ्यावर्शांनंतर प्रथमच माझा एकट्याचा प्रवास चालू झाला.  सुरूवातीचे दिवस मी खूप उत्साहात होतो. नवीन काम , नवीन प्रदेश फिरायला मिळत होता.. पण हा उत्साह फार काही टीकला नाही.  बच्चूसिंगला निरनिराळी व्यसने होती. पहिले काही दिवस मी ह्या कडे दुर्लक्ष केले. पण नंतर मला त्याचा त्रास व्हायला लागला.  एका रात्री त्याने दारूच्या नशेत मला खूप शिविगाळ आणि मारहाण केली आणि मी खूप घाबरलो काय करावे कळत नव्हते. पण मनातून ठरवलं होते की आता ट्रकवर राहायचे नाही. रात्र खूप  झाली होती.. बच्चू सिंग बऱ्याच वेळ नशे मध्ये बडबड करत झोपी गेला होता. रात्रीचा दीड वाजला होता. मनात खूप गोंधळ उडाला होता. पैसे चेक केले...साधारण पंधराशे रुपये होते. मनात काही दुसरा विचार येण्याचा आत मी माझे बोचके उचलले आणि बच्चू सिंगला सोडून तिथून पळालो.
ते कुठले गाव होते, मी कुठे  आहे  आणि मला कुठे जायचे काहीच माहित नव्हते. त्या घडीला मी फक्त तेथून पळ काढला होता. बऱ्याच लांब गेल्यावर मी बऱ्यापैकी भानावर आलो... आजूबाजूला पहिले  तरी सगळीकडे शांत रस्त्यावर कोणीच नाही. एव्हाना पहाटेचे तीन  वाजले  होते. अचानक मला खूप भीती वाटू लागली.. अंधाराची,  एकटे असण्याची. चोरबीर आले तर. चोरच काय पोलीस आले तर काय होईल  या विचारांनी आणखीच  घाबरलो. पण माझ्या नशिबाने थोडे पुढे गेल्यावर एक रस्ता लागला जिथे थोडीशी  जाग होती. एक डेअरी होती तिथे पहाटेची दुधाची गाडी आलेली होती. जवळच एक चहाची टपरी उघडी होती. बाजूला एक रिक्षा स्टॅन्ड होता. टपरीवर गरम गरम चहा प्यायला. खूप बरे वाटले. तिथेच चौकशी केली आणि कळले की जवळच बस स्टॅन्ड आहे. नगर जवळचे कुठलेतरी ते  गाव होते. बस स्टॅन्डवर आलो समोरच नाशिकला जाणारी बस दिसली. कुठलाही विचार न करता मी सरळ बस मध्ये चढलो. सकाळी सकाळी नाशिकला पोचलो. बस स्टॅन्ड वरच हातपाय तोंड चांगले धुतले..जवळच्या बोचक्यातले धुतलेले कपडे घातले आणि निघालो...पण कुठे?  या प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नव्हते.पण एक मात्र होते की घरी परत जाण्याचे सर्व दोर मी कापून टाकले होते.
दिवसभर मी नाशिकमध्ये इकडे तिकडे कुठे काम मिळतंय का या  शोधात फिरलो. अनोळखी प्रदेश, अनोळखी माणसे नुसताच वणवण फिरलो पण कुठे काम मिळाले नाही. आजकाल ओळखीच्या माणसाला पण कोणी पटकन मदत करत नाही तर मला कोण विचारणार. जशी जशी संध्याकाळ जवळ आली तस तशी माझी बेचैनी, भीती वाढू लागली. रात्र कुठे घालावायची ह्या चिंतेनी मी  बेचैन झालो. एव्हाना मला घर सोडून  वीसएक दिवस झाले होते. पण इतके दिवस बच्चूसिंग बरोबर असल्याने रात्र कुठे घालवायची हा कधी प्रश्नच पडला नाही. काय करावे कळत नव्हते. एक मन "उगीच घर सोडले,  निदान बच्चू ला तरी सोडायला नको  होते "अशी  स्वतःलाच दुशणे देऊ लागले. खूप उदास मनस्थितीत मी परत स्टॅन्डवर जाऊन रात्र काढायची असे ठरवले आणि निघालो. तेव्हड्यात मला समोर भगवे कपडे घातलेले पाच सहा साधु जाताना दिसले. त्यांच्या हातात झोळ्या होत्या, कपडे मळकट होते. एकमेकांबरोबर गप्पा मारत ते बस स्टॅन्डच्याच दिशेने चालले होते. नकळत मी त्यांच्या मागोमाग जाऊ लागलो.  त्यांच्या बरोबरच बसमध्ये चढलो आणि त्र्यंबकेश्वरला पोचलो. तिथे गेल्यावर ते साधु इकडे तिकडे पांगले. ते देवस्थान खूप मोठे होते. तो परिसर रात्रीची वेळ असूनही  भाविकांच्या गर्दीने ,  साधुसंत - विक्रेते, तसेच माझ्या सारखी माणसं यांनी खूप गजबजलेला होता. तिथल्याच एका हॉटेल मध्ये मी जेवलो आणि रात्री भाविकांसाठी बांधलेल्या एका धर्मशाळेत रात्र काढली.
पहाटे पहाटे मंदिरातील काकड आरती व  घंटानादाच्या  आवाजानी मला जाग आली. तिथेच घाटावर अंघोळ केली आणि देवदर्शन करून  आलो खूप छान वाटलं. घर सोडल्या पासून बऱ्याच दिवसांनी मला खूप फ्रेश वाटत होते. पण जसं जसे उजाडलं तसें आता पुढे काय?  हा प्रश्न मला परत बेचैन करू लागला. असेच तिथे फिरत असताना एका घाटावर काही भटजी व काही साधु एका कुटूंबासाठी कसलीशी शांत करत होते. मी पण तिथेच जवळ बसून नकळत त्याच्या बरोबर मंत्र पाठन करायला लागलो. लहानपणी वडिलांबरोबर देवळात जाण्याचा आज मला फायदा झाला. माझे स्पष्ट शब्दोतचार  तिथे असलेल्या एक दोघांच्या लक्षात आले.  त्यांचे सर्व विधी संपल्यावर त्यातल्या एका पस्तीशीतील साधूने माझी चौकशी केली.माझी सर्व कहाणी ऐकून त्याने मला धीर दिला व म्हणाला की बघतो त्याच्या ग्रुपमध्ये काही सोय होतेय का. त्याचे नाव जगदीश असे होते. 
जगदीश मला त्यांच्या आश्रमात घेऊन गेला. मला बाहेर उभे करून तो आत गेला. बऱ्याच वेळ झाला तो आलाच नही. बाहेर मी पुढे काय? याचा विचार करत होतो. ह्या लोकांबरोबर 2-3दिवस राहायची व जेवणाची सोय जर  झाली तर मला थोडे  स्थिर होऊन इकडे तिकडे काम शोधता येईल असा माझा विचार होता. बऱ्याच वेळा नंतर तो बाहेर आला व म्हणाला की तुझी राहायची इथे सोय होईल पण पडेल ते काम करण्याची तयारी  आहे काय?  माझ्याकडे कडे त्या क्षणी हो म्हणण्या वाचून पर्याय नव्हता. तो मला आत घेऊन गेला. बाहेरून छोटा वाटणारा आश्रम आतमध्ये बऱ्यापैकी मोठा होता.एक मोठा हॉल.. त्याच्या एका भिंतीवर बरेच देव देवतांचे फोटो लावलेले होते. खाली जमिनीवर तिथे लावलेल्या धूप - उदबत्ती यांची राख तशीच पडलेली होती. सर्व भिंती धुराने काळवंडल्या होत्या. एका भिंतीवर सात आठ हुक आणि खुंट्ट्या लावल्या होत्या व प्रत्येक खुंट्टीवर दोन तीन याप्रमाणे बऱ्याच झोळ्या लाटकवलेल्या होत्या.खाली बऱ्याच वळकट्या आणि पथाऱ्या पसरलेल्या होत्या त्यावर दोन चार साधु पडले होते. ही त्यांची झोपण्याची जागा असावी असा मी अंदाज बांधला. आणखी एका भिंतीखाली दोन तीन मोठ्या पेट्या पडल्या होत्या त्यावर बऱ्याच जुन्या नव्या पंचागांचा गठ्ठा पडला होता.तिथेच एका पेटीवर काही तुटलेले रुद्राक्ष काही नवीन माळा,  जुनी नवी भगवी वस्त्र पडली होती. जमिनीवर बऱ्या पैकी कचरा होता त्यात चिलीमीची आणि बिड्यांची थोटकं सुद्धा बरीच होती. एकंदरीत पाहता तो आश्रम म्हणून अजिबात आकर्षित नव्हता. पण त्या ट्रकच्या तेलकट मळकट  आणि अरुंद जागे पेक्षा ही जागा खूपच सुसह्य होती.
जगदीश मला आतल्या खोलीत एका मोठ्या साधुकडे घेऊन गेला त्याला सर्व जण बाबा म्हणत होते. जगदीशने त्या बाबाला माझ्याबद्दल आधीच माहिती दिली होती. मी त्याला नमस्कार केला. बाबा म्हणाला आजपासून तु इथेच राहा. इथली साफसफाई, पाणी भरणे इतर पडेल ती छोटी मोठी कामे तसेच रात्रीचे जेवण करण्यास मदत करणे असे  कामचे स्वरूप मला सांगण्यात आले.पैशाचे काहीच बोलला नही आणि मी ही विचारलं नाही.
तो दिवस त्या आश्रमातील  पद्धती, इतर साधुंशी  ओळखी, बाबा विषयी माहिती मिळवणे व बाकी कामे समजून घेण्यात गेला.
तिथे एक जगदीश सोडला तर कोणीच माझ्याशी विशेष बोललं नाही. मी पण नवीन असल्याने जरा बावरूनच वागत होतो.
दुसऱ्या दिवसापासून मात्र मी हळू हळू आश्रमातील दिनचर्येचा भाग बनून गेलो. पहाटे पाचला उठावे लागे. पहिल्याच दिवशी मी सगळ्यांना चहा करून दिला आणि आश्चर्य म्हणजे सर्वाना खूपच आवडला. अगदी बाबा पासून सर्वांनी कौतुक केले. आणि काय ते माहित नाही पण त्या चहाने मला सर्वांनी आपलेसे केले.
आश्रमात बाबा सोडून  आणखी सात साधु होते. काही दिवसातच मला त्यांचा दिनक्रम समजून आला. मुख्य साधु म्हणजे बाबा,  त्याच्या कडे आठवड्यात काय काय कार्यक्रम  करायचे ह्याची आधीच नोंद असायची. त्याच्या बरोबर आश्रमात आणखी सात साधु होते.  एकेका दिवशी बरेच कार्यक्रम असायचे. कधी नारायण नागबळी,  कधी कालसर्प विधी तर कधी त्रिपिंडी श्राद्ध नाहीतर नुसताच महाअभिषेक किंवा महामृत्युंजय मंत्र पठण,  अखंड  रुद्राभिषेक अशा अनेक कार्यक्रमांनी सर्व जण अगदी व्यस्त असायचे. मी मात्र
दिवसभर आश्रमात थांबून तिथली कामे करायचो. साफसफाई, स्वयंपाक पाणी  व  इतर कामे करण्यात वेळ निघून जायचा. मला इथे आता परकेपणा वाटत नव्हता. तो आश्रम,  ते मंदिर,तो सुंदर परिसर, तिथले पुजारी,  साधू ह्या संगळ्यांमध्ये मी इतका सामावून गेलो होतो की मी माझे  घर, बच्चूसिंग, माझे पळून जाणे हे सर्व पूर्ण पणे विसरून नव्याने आयुष्य चालु केले. असेच काही दिवस...एक दोन महिने गेले.

एक दिवस संध्याकाळी सर्वजण नेहमी प्रमाणे आपापले विधी, कार्य करून परत आले. पण वातावरण मला काही ठीक वाटत नव्हते.  त्यादिवशी सर्वच जरा धुसफूस करतच आश्रमात आले. आमच्यात दोन नोर्थ इंडियन होते ते आलेच नाहीत. काहीतरी गडबड होती हे जाणवत होतं पण विचारायचं कोणाला हे कळत नव्हतं. शेवटी जगदीश ने मला सर्व काही सांगितलं. तो म्हणाला की बाबा आणि आश्रमातले दोन नोर्थ इंडियन साधु यांची खूप वादावादी झाली. एरवी आश्रमात अधून-मधून त्यांच्यात वाद होत असतात पण त्या आश्रमातल्या आश्रमात असतात परंतु या वेळेला मात्र ते देवळात विधी झाल्यानंतर सर्वांसमोर झाले. मुद्दा अर्थातच पैशांवरून होता.
 हे दोघे रात्री आलेच नाहीत. दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसात वाजता ते आले आणि सरळ बाबाच्याच्या रूम मध्ये गेले. अर्धा एक तास त्यांच्यात बरीच बाचाबाची झाली आणि थोड्या वेळाने बाबा त्यांना घेऊन बाहेर  आला आणि सर्वाना सांगितले की आजपासून हे दोघे इथे राहणार नाहीत. ते दोघे निघून गेले आणि आता पाच जण आश्रमात राहू लागले... काही दिवस असेच गेले. एक दिवस अचानक जगदीश माझ्याकडे आला आणि म्हणाला तयारी कर. तुला आमच्याबरोबर घाटावर यायचे आहे. एक महारुद्राभिषेक आहे त्यासाठी एकजण कमी पडत आहे. त्यामुळे बाबांनी सांगितलं तुला तयार करून लगेच आण. जगदीश ने मला भगवी वस्त्र दिली, गळ्यात रुद्राक्षांची माळ घातली. दोन्ही दंडांना पण रुद्राक्षाच्या माळा बांधल्या कपाळावर भस्म लावलं आणि म्हणाला चल. हे सगळे अचानक घडल्यामुळे मी पुरता भांबावून गेलो. निघताना माझे लक्ष आरशात गेले आणि क्षणभर मी स्वतालाच ओळखले नाही. इतके दिवस मी या साधुंबरोबर राहत होतो पण माझा पेहराव अगदी साधाच होता, मी त्यांच्याबरोबर राहात असून सुद्धा त्यांच्यातला नव्हतो. आज मी आरशामध्ये माझ्या स्वतःच्या रूपात नवीन साधुला पाहत होतो. माझा विश्वासच बसत नव्हता इतके हे अनपेक्षित आणि अचानक घडले. 
त्या दिवसापासून त्या क्षणापासून माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली.... मी साधु बनलो.. मी साधु झालो.
 तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. कारण त्यादिवशी एका भटक्या, उनाड मुलाचे एका साधूमध्ये रूपांतर झाले होते. त्या दिवसापासून माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. बेकार असताना कोणी स्वीकारले नाही पण भगव्या कपड्यात मात्र सर्वांनी स्वीकारले.
इतकी वर्षे मला लोकांनी अशिक्षित,  बेकार म्हणून हिणवले आता तेच उच्च शिक्षित, सधन लोक आता त्यांचे प्रॉब्लेम्स,  त्यांची दुःख घेऊन माझ्या कडे, आमच्या आश्रमात समाधान शोधण्या साठी येत होते.

अचानक शांतीभुषणच्या खोकण्याच्या आवाजाने मी भानावर आलो... एव्हाना पहाटेचे तीन साडेतीन वाजून गेले होते. उघड्या दरवाज्यातून गारसर वाऱ्याची झुळूक आत येत होती. सोळा वर्षाचा काळ मागच्या दोन तासात झर्रकन डोळ्यासमोरून गेला. 
कुठेतरी मनामध्ये एक समाधानाची भावना रेंगाळत मी शांतपणे झोपी गेलो.

बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१८

डावा हात ...

डावा हात ...

मध्यंतरी whats up वर एक video फिरत होता त्यात एक आवाहन होते की Surprise your brain by doing something different that your brain isn't used to. त्यामध्ये १५ ओक्टोबर ते १ नोव्हेंबर याकाळात रोज दात डाव्या हाताने brush करा आणि तुमचा मेंदू त्याचा कसा स्वीकार करतो ते पहायचे असे challenge होते.
मी ह्या अनुभवातुन गेलो. त्यातील काही गमतीजमती तुम्हाला सांगत आहे.
आगदी पहील्या दिवशी सकाळी मी सवयी प्रमाणे Brush उजव्या हातात घेतला आणि मनाने आदेश दिला की अरे आजपासून तु डाव्या हाताने ब्रश करणार आहेस. लगेच मी ब्रश डाव्या हातात घेतला आणि त्यावर पेस्ट लाउन ब्रश करायचा प्रयत्न करू लागलो पण आजिबात जमेना. एकदोनदा हिरडीला जोरात ब्रश जोरात लागला. एक मन म्हणायला लागले की सोडून दे तुला जमणार नाही. क्षणभर मला वाटते पण की कशाला करतोय आपण हे सर्व. पण त्याचवेळी नकळत माझ्या मनाचे जणु दोन गट पडले एक डाव्या हाताचे मन आणि दुसरे उजव्या हाताचे मन.
एक मन डाव्या हाताच्या बाजूने ठामपणे उभे राहिले व म्हणाले की कर तु जमेल तुला आणि पहिला दिवस कसाबसे मी दात घासले.
दुसऱ्या दिवशी मात्र आधी पासूनच आज आपल्याला डाव्याहाताने दात घासायचे याचे मनामध्ये Auto suggestion चालू झाले. इकडे उजव्या हाताचे मन म्हणत होते की ह्याला नाहि जमणार आणि परत माझ्याच कडे येईल. पण तसे झाले नाहि. दुसऱ्या दिवशीही इकडे तिकडे ब्रश लागला, टूथपेस्ट थोडी शर्टवर सांडली .. डाव्या हातानी चुळ भरताना तर त्रेधातीरपीट उडाली. एकदोनदा तर चुळ भरताना पाणी direct बनीयनच्या आत गेले. हे सर्व चालले आसताना उजवा हात मात्र मजा पहात होता.. जणु डाव्या हातची चेष्टाच करत होता. दोनतीन दिवस असेच धडपडीत गेले.. अगदी आपण नुकतेच सायकल चलवायला शिकताना जसे होते तसे.
असेच पाच सहा दिवस गेले आणि डाव्या हाताला आता थोडेथोडे जमु लागले.. आणि त्याचा Confidence वाढला. एव्हढा की आगदी तो कधी दात घासायला मिळतायत आणि कधी मला माझे कसब दाखवला मिळतेय यांची वाट पाहु लागला.
उजव्या हाताला देखील कळूनचुकले कि हा पठ्ठया माघार घेणाऱ्यातला नाही. त्यानी थोडे नमते घेतले आणि आता तो पण त्याच्या मनाविरुद्ध का होइना डाव्या हाताला सपोर्ट करायला लागला.
बघता बघता १ नोव्हेंबर पर्यंत मी डाव्या हाताने आगदी व्यवस्थीतपणे दात घासु लागलो. उजव्या हाताने पण डाव्या हाताचे हे यश आगदी मनापासून स्वीकारले.

खरेतर ही घटना आगदी छोटीशी आहे पण त्यातुन मी बरेच काही शिकलो. आपल्या वयक्तिक आयुष्यातही आपण कितीतरी वेळा अशा प्रसंगातुन जातो... जीथे प्रत्येक डाव्या हाताला उजव्या हातासमोर स्वतःला prove करावे लागते.

हेमंत पुरोहित.