रविवार, ५ एप्रिल, २०२०

बार्बेट पती-पत्नी

मध्यंतरी आमच्या एरियात एक पाहुणा आला. सकाळी सकाळीच  एक दोन फेऱ्या मारून  गेला. बहुदा घराच्या शोधात होता तो. सुरवातीला  एकटाच होता. दोन तीन दिवस त्याने  अशाच चकरा मारल्या.. आणि एक दिवस तो तिला घेऊन आला. आमचं कुतूहल वाढले.. त्यांच्या एकंदर हालचाली वरून आम्हाला एक गोष्ट कळली कि हे आमच्याच भागात राहायला आले आहेत. तो जणू शिफ्टिंग च्या गडबडीत होता आणि  ती एखाद्या गृहिणी प्रमाणे या भागात पाणी व्यवस्थित आहेना, खाण्यापिण्याच्या वस्तू,  मार्केट,  गिरणी वगैरे जवळ आहेना,  अश्या  तिच्या गरजेच्या गोष्टी जवळपास मिळतायतना याची चाचपणी करत होती. एकंदरीत पुढच्या चार पाच दिवसात हे  जोडपे नवीन घरात, आमच्या एरियात रुळले.

आमच्या स्वभावानुसार,  आमच्या मनात ह्यांचे नाव काय? कुठून आले?  दोघेच आहेत  कि आणखी कोणी आहे बरोबर? आमच्या भागात एक्झॅटली  कुठे राहतात? वगैरे वगैरे असे एक नाही अनेक प्रश्न होते. पण विचारायचं कोणाला?  कारण जे जोडपं आमच्या भागात राहायला आले होते ते आपल्यातले  कोणी नसून एक छानशी पक्षांची जोडी होती. मळकट पोपटी - हिरव्या रंगाची हि पक्षांची जोडी नकळत आमच्या रोजच्या रुटीन मध्ये एक नवीन उत्साह घेऊन आली.
अजून त्यांचे नाव कळलं नसल्याने ती एक उत्सुकता अस्वस्थ करीत होती. त्यामुळे आम्ही लगेच गूगलबाबा, आमचे  सोशल ग्रुप्स - बर्डस  ऑफ गोवा किंवा वाइल्ड लाईफ ऑफ गोवा वगैरे  इथे मिळेल तेव्हढी या पक्षांबद्दल माहिती गोळा केली. शेवटी त्या पक्षाचे नाव कळले.. त्याचं नाव होते बार्बेट.. white cheeked Barbet, मराठीत त्याचे नाव तांबट असे आहे. मला आणि माझ्या बायकोला बार्बेट हे नाव खूप आवडले. त्यादिवसा पासून आम्ही त्यांना बार्बेट पती-पत्नी असे गमतीने म्हणू लागलो.
खरंतर याच दिवसात आम्हाला एका वेगळ्याच पक्षाचा आवाज ऐकू येत होता.  कूटूररर... कूटूररर (cooturrr) असा आवाज ऐकू यायचा आणि थोड्यावेळाने त्याला प्रतिसाद मिळायचा.  आम्ही अंदाज बांधला कि हा ह्याचाच आवाज असावा. एकदा नाव कळले कि आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल एक ओळखीची, आपुलकीची भावना  निर्माण होते. आमचं तसंच झालं. त्यामुळे  गुगलवरून आवाज तपासाला तर तो बार्बेटचाच निघाला.

मग आम्ही त्यांचे घरटे कुठे आहे त्याचा शोध घेऊ लागलो. पण नेट वरच्या माहिती वरून कळले के हे पक्षी घरटे बांधत नाही तर एखाद्या झाडाच्या मृत फांदीला मोठे भोक पडतात अगदी बिळा प्रमाणे आणि त्यात राहतात. आमच्या आजूबाजूच्या झाडांचे निरीक्षण करत असताना आम्हाला किचनच्या ग्याल्लरीतुन  सप्तपर्णीच्या झाडाची एक जराशी वाळलेली फांदी दिसली आणि त्यावर एक बिळासारखं भोकही दिसलं. भोक जरा लहानच वाटत होते. भोक मिळाले याचा आम्हाला आंनद झाला खरा पण  जोपर्यंत बार्बेटला त्यात जाताना पाहत नव्हतो तोपर्यंत ते त्याचेच घर आहे याची खात्री पटत नव्हती. त्यामुळे आता आम्हाला नवीनच नाद लागला कि जेव्हा जेव्हा बार्बेट पती-पत्नी दिसले कि ते कुठे जातात  किंवा त्यांचा आवाज ऐकू आला कि तो कुठून येतोय त्याचा मागोवा घेऊ लागलो आणि एका वेळी एक बार्बेट त्या घरात शिरताना पाहिला आणि आमची खात्री पटली कि ते घर त्यांचेच आहे. आमची दोन तीन दिवसांची तपश्चर्या  फळाला आली. 
जसजशी बार्बेट पती-पत्नींबद्दल जास्त माहिती मिळत गेली तसतशी त्यांची ओळख आम्हाला जास्त घट्ट होत गेली. 
त्यांचा आवाजाची  आता आम्हाला चांगलीच सवय झाली.जसजसें  दिवस जाऊ लागले तसतसें यांच्या ओरडण्याचा आवाज मोठा होत  होता. त्यांच्या घरट्यावरच्या चकरा पण आता वाढल्या होत्या.तिथूनच थोड्या अंतरावर एक पपईचे व फणसाचे झाड होते. पिकलेल्या पपया आणि फणस हे यांचे आवडते खाद्य. या दोन झाडांवर बार्बेट पती-पत्नींच्या दिवसभर असंख्य चकरा होत असत.
बिळाजवळ आले कि एक जण आत जायचा तर एक बिळाबाहेर थांबायचा..नवीन खाद्य शोधायचा. खाण्यापिण्याची काही कमी नव्हती.

एव्हाना आम्हाला जाणवले होते कि बार्बेट पती-पत्नींनी आत अंडी घातली आहेत आणि आलटून पालटून दोघे दिवसा अंडी उबवण्याचे काम करतात. यांच्या विषयी आणखी माहिती काढतांना असे कळले कि हे साधारणपणे डिसेंबर ते मे -जून पर्यंत एकमेकां सोबत जोडीने असतात. त्यांच्या कूटूररर... कूटूररर (cooturrr)असा ओरडण्याच्या आवाजाची तीव्रता त्यांचा एकत्र येण्याच्या काळात खूप वाढते. नंतर नंतर म्हणजे अंडी उबवण्याच्या काळात वा पिल्लं अंड्यातुन बाहेर येण्याचा काळात त्यांच्या आवाजाची तीव्रता कमी होत जाते.
त्यांना त्यांचे घरटे करायला - म्हणजे  झाडावर बिळ खोदायला साधारण वीस दिवस लागतात. त्यांना पाहिजे तसे बिळ तयार झाले कि तीन चार दिवसातच ते अंडी घालतात. सर्व साधारण  पणे हे पक्षी  एका वेळी  दोन किंवा तीन अंडी घालतात. दिवसा दोघेही अंडी उबवतात पण रात्री मात्र हे  काम फक्त मादीच करते. चौदा-पंधरा दिवसात अंडी पूर्ण तयार होऊन पिल्लं बाहेर येण्यासाठी तयार होतात.
आम्ही दोघे या बार्बेट पती-पत्नींच्या इथपर्यंतच्या  सहजीवनाचे नकळतच साक्षीदार झालो होतो. आता पुढे काय...?   हे मानवी स्वभावा प्रमाणे कुतूहल होतेच.  बिळात अंडी आहेत याची खात्री होती पण आतले काही दिसत नसल्याने पिल्लांबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली होती. काहीनाकाही कारण काढून आम्ही किचनच्या ग्याल्लरीत जायचो आणि बिळातून कोणी बाहेर डोकावतोय का ते पहायचो. 
दोन तीन दिवस असेच अस्वस्थतेत गेले...आणि तो क्षण आला. ज्याची आम्ही एवढे दिवस वाट पाहत होतो तो क्षण आला. त्या बिळातून एक कोवळी चोच बाहेर डोकावताना दिसली. थोड्या वेळाने दोन चोची दिसल्या आणि परत आत गेल्या. आमची खात्री पटली..आत मध्ये दोन पिल्लं असल्याची शुभवार्ता समजली.

                   
काही महिन्यापूर्वी आमच्या इथे रहायला आलेले हे बार्बेट पती-पत्नी आता दोन गोंडस पिल्लांचे आई-बाबा झाले होते.


२ टिप्पण्या: