सोमवार, ३० मार्च, २०२०

प्रवास

प्रवास 
प्रवासाची आवड मला लहानपणापासूनच होती. पूर्वी जास्तकरुन रेल्वे किंवा बसचा प्रवास असायचा. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेबरोबरच लोक विमानाने प्रवास करायला लागले तर बसऐवजी काहीजण स्वतःच्या गाडीने प्रवास करणे पसंत करु लागले.
प्रवास कुठलाही असो प्रत्येक वेळी एक वेगळा अनुभव, एक वेगळा आनंद देऊन जातो.
मला स्वतःला निरनिराळ्या नवीन ठिकाणी फिरण्याची खूप आवड आहे आणि मुख्य म्हणजे ड्राइव्हिंगची खूप आवड आहे  त्यामुळे कितीही लांबचा प्रवास असो मी स्वतः ड्राईव्ह करायला कधीही तयार असतो.
इतके वर्ष गाडी घेऊन निरनिराळ्या ठिकाणी भटकताना  मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे प्रवासात येणारे अनुभव आणि आपल्या आयुष्यात येणारे अनुभव यात कमालीचे  साम्य आहे.
खालील लेखामध्ये मी हे माझे अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला  आहे.--
मुळातच कुठलेही वाहन चालवायला  शिकणे म्हणजे अगदी लहानमुलाने चालायला शिकण्यासारखे असते. तो चालायला शिकताना धडपडतो, आपटतो कधी कधी लागते सुद्धा..  पण एकदा  मात्र त्याला स्वतः कोणाचही आधार न घेता उभे राहून एक एक पाऊल पुढे  टाकून चालण्याचा कॉन्फिडन्स आला की त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह काही विचारू नका. जवळपास तोच उत्साह,  आनंद मला नेहमी नवीन  गाडी शिकणार्यांमध्ये  दिसतो.
जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या शहरांत गाडी चालवता तोपर्यंत तुम्ही शाळेतील मुलांसारखं protected आयुष्य जगत असता पण तुम्हाला खरी कॉम्पिटिशनची जाणीव होते ती तुम्ही आपल्या शहाराबाहेर गेल्यावर. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा  highway वर जाता तेव्हा तुमची अवस्था एकदम शाळेतून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेल्या मुलांसारखी असते. Highway वरचा झगमगाट, इतर गाड्यांचे  स्पीड पाहून आपण कॉलेजमध्ये नवीन ऍडमिशन घेतलेल्या मुलासारखं बावरून जातो. कॉलेजमध्ये सिनियर मुलामुलींचे कपडे, त्यांचे बिनधास्त वागणं, त्यांची स्टायलिश लाईफस्टाईल पाहून एखाद्या साध्या मुलाला जसा इंफेरीयॉरिटी कॉम्प्लेक्स येतो तसेच काहीसे ह्या नवख्या ड्राइव्हरचे पहिल्यांदा हायवेवर आल्यावर होते. इतके दिवस त्याला वाटत असे की आपलीच गाडी गावात बेस्ट आहे म्हणून पण इथे आल्यावर तर एका हुन एक नवंनवीन गाड्यांची मॉडेल्स पाहायला मिळतात.तो नवखा ड्राइवर बिचारा एक लेन (बऱ्याचदा चुकीची )पकडून गाडी चालवू लागतो. जरा इकडे तिकडे झाल्यास आजूबाजूच्या लेन मधून सिनियर्स जोर जोरात हॉर्न वाजवून स्पीडने ओव्हर टेक करत निघून जातात. त्यातून परत बरोबर आई वडील,किंवा बायको यांचे सततचे काहींना काही सल्ले चालूच असतात त्यामुळे तो आणखीच गोंधळलेला असतो. हळूहळू 
काही दिवसात मुलगा जसा कॉलेजमध्ये रुळतो तसा हा नवखा ड्राइव्हर सुद्धा हायवेच्या ड्रायव्हींग मध्ये सराईत होतो.

रस्त्यावर एकाच वेळी अनेक गाड्या धावत असतात. खरं तर प्रत्येक गाडीचा स्पीड तिच्या इंजिनच्या ताकदीनुसार व  ड्राइव्हरची इच्छाशक्ती व चालवण्याचे कसब यावर अवलंबून असतो. आपलेपण तसेच असते. काही मुलं खूप हुशार असतात काही एव्हरेज असतात तर काही स्लो असतात. पण प्रत्येक जण आपापल्या परीने शिकत असतो..पुढे जात असतो.

मोठया गाड्यांचा स्वभाव म्हणजे शाळेतील एखाद्या हुशार मुलासारखा असतो. एखाद्या परीक्षेत दुसऱ्या ऍव्हरेज मुलाला कधी चार पाच मार्क्स जरी जास्त मिळाले कि हा हुशार मुलगा जसा अस्वस्थ होतो आणि मीच खरा हुशार आहे म्हणून त्या बिचाऱ्या ऍव्हरेज मुलाच्या पुढे जाण्यासाठी जसा आटापिटा करतो तसेच काही ह्या मोठया गाडीवाल्याचे असते. खरे तर एखाद्या छोटी गाडीने कधी तरी धीर करून एखाद्या मोठया गाडीला ओव्हर टेक केले  तरी तिला पण माहित असते की आपल्याला जास्त वेळ पुढे राहता येणार नाही म्हणून, कारण तेव्हडी ताकदच नसते. तरी मला ओव्हरटेक कसे केले म्हणून मोठीचा इगो दुखावतो आणि तो भन्नाट वेगाने, मोठ्याने हॉर्न मारत त्या छोटया गाडीला घाबरवत ओव्हरटेक करून निघून जातो.

स्पीड ऑफ द बॉस इज स्पीड ऑफ ऑर्गनायझेशन -- बऱ्याच वेळा ऑफिस मध्ये आपला बॉस किंवा टीम लीडर खूप स्लो डिसिजन मेकर असतो किंवा तो लीडर बनायला योग्य नसतो. त्याच्यामुळे अख्या टीमची किंवा ऑर्गनायझेशनची प्रोग्रेस मंदावते.अशावेळी टीममधील एखादा ऍग्रेसिव मेंबर बंड करतो आणि सगळी सूत्रे स्वतःच्या हातात घेतो व काही दिवसातच पूर्ण ऑर्गनायझेशनला एक नवीन गती प्राप्त होते. अगदी याचाच प्रत्यय हायवे वरती ड्रायव्हिंग करताना येतो. बरेचदा आपल्यापढे बऱ्याच गाड्यांची रांग हळूहळू पुढे सरकत असते, रांगेतील सर्वच गाड्या एका संथ गतीने पुढे चालललेल्या असतात. आपण एवढ्या स्लो का चाललोय हे बराच वेळ कोणालाही कळत नसते कारण पुढचा स्लो आहे म्हणून मागचा स्लो चालवत असतो. अशा वेळी मध्येच एखादी गाडी धाडस करते आणि पुढच्या गाड्यांना ओव्हरटेक करत पुढे जाते. मागच्या गाड्या त्या गाडीला फॉलो करतात आणि ऑटोमॅटिक सगळ्यांचा स्पीड वाढतो. पुढे गेल्यावर कळतं की ज्या गाडीमुळे आपण सर्व एवढे स्लो चाललो होतो तो एक छोटासा टेम्पो होता. तो स्लो चालला होता त्यामुळे त्याच्या गतीने मागच्या सर्व गाड्या त्याला फॉलो करत होत्या.

बऱ्याच वेळा रस्ता छान मोकळा असतो आपणही आनंदात ड्रायविंग करत असतो आणि अचानक समोर ट्राफिक जाम दिसतो. काही मोठे ट्रक्स, कंटेनर्स दाटीवाटीने गर्दी करून चाललेले असतात. अचानक आलेल्या ह्या जाम मुळे आपण लगेच uneasy होतो, चीडचड करतो. उगीचच  हॉर्न मारतो,  रॉंग साईड ने पुढे जायचा प्रयत्न करतो. पुढील काही वेळातच पुढचे दोन कंटेनर्स डिझेल भरायला वळतात, एक दोन ट्रक्स सायडिंगला थांबतात आणि रस्ता हळुहळु मोकळा होतो.आपल्या आयुष्यातही असेच घडते... वाईट काळ येतो सर्व काही ठीक चाललं असताना अचानक अडचणींचे डोंगर उभे राहतात,  खरं तर तो एक काळ (phase ) असतो त्यातून सर्वांना जावच लागतं. परंतु त्याला सामोरे जायच्या आधीच काहीजण निराश होतात,  हताश होतात. खरेतर धीराने या काळाला सामोरे गेलात तर हळू हळू सर्व प्रॉब्लेम्स सुटत जाऊन सर्व काही सुरळीत होते.

ह्या प्रवासात मला आणखी एक साम्य आढळले ते म्हणजे मोठ्या प्रवासात काही गाड्या खूप काळ आपल्या मागे पुढेच किंवा बरोबर असतात.. नकळत आपलं एकमेकांशी एक मूक नातं तयार  होतं अगदी एखाद्या मित्रा बरोबर किंवा कॉलेज मधील मैत्रणीबरोबर असते तसेच. ह्या गाड्यांमध्ये पण एक प्रकारचा बॉण्ड निर्माण होतो. एखादी  खूप पुढे गेली किंवा बराचवेळ दिसली नाही तर ती कुठे गेली असेल अशी मनात चुटपुट लागून राहतें...आणि पुढे ती (गाडी )परत दिसली की नकळत मनातल्या मनात बरे वाटते.
अगदी काहीवेळा असाही अनुभव येतो एखाद्या दुसऱ्या राज्यात आपल्याला आपल्या राज्याच्या रेजिस्ट्रेशन ची गाडी दिसते आणि क्षणभर का होईना आपल्याला आपला गाववाला भेटल्याचा आंनद होतो.
बऱ्याचदा ह्या गाड्या म्हणजे आपल्या वर्गातल्या मित्रांप्रमाणे असतात. शेवटच्या वर्षापर्यंत एकत्र मजा करतात आणि शिक्षण पूर्ण  झाले की सर्वजण कॅरिअर करण्यासाठी निरनिराळ्या शहरात, देशात जातात...व नंतर त्याची पुढे भेट पण होतं नाही तसंच काहीसे ह्या बरोबरच्या साथीदार गाड्यांचे असते. एखाद्या गावापर्यंत, एखाद्या जंक्शन पर्यंत या पाच सहा तास एकत्र असतात नंतर निरनिराळे रस्ते पकडतात आणि पुढच्या प्रवासात कुठे भेटतही नाहीत.

प्रवास आणि आयुष्याचा प्रवास आपल्याला प्रत्येकवेळी एक नवा अनुभव देऊन जातो..त्यातुनच आपण नवीन काहीतरी शिकतो आणि त्याच्या जोरावर पुढच्या प्रवासासाठी जोमाने तयारी करतो.



७ टिप्पण्या:

  1. मस्तच हेमंत. छान लिहिलंयस. तुझे फोटो छान असतातच. लिहितोस पण chhan. असाच लिहीत रहा. 👍🤩

    उत्तर द्याहटवा
  2. ट्रॅफिक व माणसाचे आयुष्य ह्याचे साधर्म्य खूप मस्त रेखाटले गेले आहे. ट्रॅफिक जॅम - शेवटून तिसरा परिच्छेद - वाचून मला माझ्या ब्लॉग वरचा हा लेख आठवला - "कधी कधी ट्रॅफिक जॅम मध्ये फसल्या प्रमाणे आपले आयुष्य होते. ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेले असतो तेव्हा ज्या वाहनात आपण प्रवास करत असतो त्या वाहनात असलेल्या शक्तीचा तो जॅम फोडायला काही जसा उपयोग होत नसतो. नाईलाजाने जॅम मध्ये अडकलेल्या वाहन चालकाला ट्रॅफिक प्रमाणे जॅम सुटे पर्यंत हळू हळू वाहन हाकत पुढे सरकत रहावे लागते. तसेच आपल्या आयुष्याचे आहे. ट्रॅफिक जॅम मध्ये फसल्या मुळे संथ गतीने गाडी हाकावी लागते तसेच विपरीत परिस्थितीत स्वतःची कितीही प्रतिभा असली तरी तिला फुलोरा येत नाही. त्या वेळेला सुद्धा पुढे सरकत रहा हे वाक्य उपयोगी पडते. जॅम संपे पर्यंत हळूहळू पुढे सरकत राहण्यातच शहाणपण असते. नाहीतर पुढच्याला धक्का तरी लागतो, किंवा मागच्याच्या शिव्या तरी झेलाव्या लागतात. अशा वेळेला आयुष्याची साडेसाती संपे पर्यंत असेच संथ गतीने पुढे सरकत राहीलेले बरे असते. मोठे अपघात होत नाहीत ट्रॅफिक जॅम किंवा चाकोरी बद्ध आयुष्यात – अनंत फंदींनी त्यांच्या फटक्यात म्हटलच आहे -...."
    http://bolghevda.blogspot.com/2011/05/blog-post.html

    उत्तर द्याहटवा
  3. थँक्स रणजित.. रोजच्या रुटीन मध्ये बरेच छोटे अनुभव येतात ते लिहायचा हा प्रयत्न होता. तूझ्या ब्लॉगचा रेफरन्स छान आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान. आयुष्याचा प्रवास आणि गाडीतील प्रवास यातले समान धागे छान रंगवले आहेत.

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान . मस्त वर्णन केलं आहे कॉलेज मध्ये नुकत्याच प्रवेश घेतल्या च्या मुलाशी साम्य आवडलं

    उत्तर द्याहटवा