बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

ओळख

ओळख
ओळख म्हटली की सर्वसामान्यपणे आपल्या सर्वांच्या समोर येते ती म्हणजे दोन व्यक्तींमधील ओळख किंवा एखाद्या व्यक्ती बद्दल असलेली माहिती. परंतु एखादी ओळख होण्यासाठी किंवा ओळख करण्यासाठी दोन व्यक्ती एकमेकांना भेटाव्या लागतात. जेव्हा त्यांना एकमेकांबद्दल माहिती होते तेव्हा त्या व्यक्ती खऱ्या अर्थानें एकमेकांच्या ओळखीच्या होतात. बऱ्याच वेळा आजच्या धावपळीवाच्या जीवनात आपल्याला हल्ली आपल्या बिल्डिंग मध्ये, इतकेच काय आपल्या मजल्यावर राहणारे लोक सुद्धा ओळखीचे नसतात. जो पर्यंत आपली ओळख नसते तो पर्यंत अगदी आपण लिफ्ट मध्ये भेटलो तरी आपले संभाषण होत नाही .. आपण अनोळखीच असतो.
मग कधीतरी एखादे सोसायटी फंक्शन होते किंवा कोणा कॉमन फ्रेंडच्या घरी ओळख होते आणि मग आपला त्या व्यक्तीबरोबर किंवा त्याच्या घरातल्यांबरोबर संवाद चालू होतो व काळानुसार आपली ओळख घट्ट होत जाते.
आमच्या बाबतीतही असेच घडले. साधारण दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही त्यावेळी वापी येथे राहत होतो. मी आणि सरिता ( माझी पत्नी ) आम्ही रोज सकाळी मॉर्निग वॉकला जायचो. सकाळी सहाच्या सुमारास बाहेर पडून जवळच स्वामीनारायण गुरुकुल नावाची शाळा होती त्या शाळेच्या गार्डन पर्यन्त जाऊन परत यायचो.असा आमचा नेहमीचा कार्यक्रम होता. शाळा उशिरा सात नंतर चालू व्हायची त्यामुळे आम्ही गार्डनमध्ये थोड्यावेळ थांबून परत फिरायचो. त्या परिसरात नेहमीची माहितीतली काही फुलझाडे होती व इतरही काही झाडे होती. साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर चे दिवस होते ते. त्या झाडांमध्ये पाच सहा झाडे बऱ्यापैकी निष्पर्ण म्हणता येतील अशी होती. त्यांच्या फांद्यांच्या टोकाला वाळकी-सुकलेली अशी थोडीशी काळपट पडलेली बोडके होती. इतर झाडांमध्ये ही निष्पर्ण झाडे विशेष कोणाच्या लक्ष्यात येत नव्हती. आमचा रोजचा दिनक्रम असा चालू होता. 
एक दिवस आमचा एक रत्नाकर ठकार नावाचा निसर्ग प्रेमी मित्र कंपनीच्या कामानिमित्त आला. त्याला निसर्गाची - फोटोग्राफीची, तसेच फिरण्याची आवड. असेच एकदिवस त्याने आम्हाला निरनिराळ्या झाडांबद्दल चित्रयुक्त माहिती असलेले डॉ.श्रीश क्षीरसागर यांचे बहर नावाचे पुस्तक आम्हाला वाचायला दिले.
आम्हाला दोघांनाही वाचनाची आवड असल्यामुळे व एक माहितीपूर्ण पुस्तक मिळाल्यामुळे आम्ही लगेच ते आवडीने वाचू लागलो. पुस्तकातील निरनिराळ्या झाडांचे फोटो चाळता चाळता अचानक एका पानावर आम्हाला एक थोडासा ओळखीचा फोटो वाटला... तशीच निष्पर्ण फांदी,तशीच ती सुकलेली बोन्डे. नकळत माझे मन आम्ही रोज पाहत असलेल्या त्या शाळेतील गार्डन मधील निष्पर्ण झाडा बरोबर तुलना करू लागले. ऑफिसला गेलो तरी कुठेतरी मनामध्ये तेच विचार. कधी एकदा सकाळ होतेय व मी परत त्या झाडाला पाहतोय असे झाले. शेवटी सकाळ झाली आणि आम्ही इतके दिवस काहीसे आमच्याकडून दुर्लक्षित आसलेल्या त्या झाडाच्या अगदी जवळ गेलो. त्याच्या सुकलेल्या फांद्यांवर असलेली ती वाळकी बोन्डे जवळून पहिली. पाच सहा बोन्डे बरोबर पण घेतली, काही पाने पण मिळाली. घरी आलो व लगेच पुस्तक उघडून त्यातील फोटो व आम्ही आणलेली पाने, बोन्डे एकमेकांबरोबर तुलना करून पहिले. दोन्ही झाडे एकच आहेत याची आम्हाला खात्री पटली. त्या झाडाचे नाव होते " ताम्हण " एका नवीन झाडाची ओळख मिळाली व एक नवीन मित्र मिळाल्याचा आनंद आम्हाला दोघांना झाला. 
त्याला " तामण " असेही म्हणतात. (Binomial name : Lagerstroemia speciosa)



पुस्तकात दिलेल्या माहिती प्रमाणे त्या झाडाचा फुले येण्याचा काळ साधारण फेब्रुवारी - मार्च पासून चालू होतो आणि उन्हाळ्यात पूर्ण बहर येतो. त्यामुळे ज्या दिवशी आम्हाला त्या झाडाची ओळख झाली तेव्हापासून आम्ही रोज फिरायला जाताना त्या झाडाला भेटू लागलो - जणू एक मूक संवाद साधू लागलो.                                                
हळुहळु  जस-जसे दिवस जाऊ लागले तसे आम्हला त्या झाडामध्ये बदल दिसू लागले. साधारण पणे डिसेंबरनंतर अचानक पणे त्या निष्पर्ण फांद्यांना हलक्या पोपटी रंगाची झाक आली व काही दिवसातच नवीन पानांची चाहूल लागत पोपटी रंगाची पालवी फुटू लागली. एखादे लहान तान्हे मुल कसे आपल्या समोर मोठे होताना पाहतो - त्याची उपडे वळण्याची,उभे राहून नंतर चालण्याची धडपड कशी आपण कौतुकाने पाहतो तसेच काही या झाडाबाबतीत आमचे झाले. त्याच्यातला प्रत्येक बदल होताना आम्ही त्याचा आनंद घेत होतो. जस-जशी पाने मोठी होऊ लागली तास-तसे ते काहीसे कोरडे असलेले झाड आता छान गुटगुटीत दिसायला लागले. अधून मधून झाडावर एक-दोन पक्षी सुद्धा दिसायला लागले. फेब्रुवारी महिना संपता संपता फांद्याची टोके हिरवट कळ्यांच्या गुच्छांनी भरून आली आणि एक दिवस आम्ही ज्या क्षणांची वाट पाहत होतो तो क्षण आम्ही प्रत्यक्षात अनुभवत होतो, काही कळ्यांमधून नाजूक पापुद्र्या प्रमाणे पाकळ्या असणारी थोडीशी गुलबट- जांभळट रंगाची फुले बाहेर डोकावायला लागली. त्या दिवशी आम्हाला झालेला आनंद अवर्णनीय होता. जणू एखाद्या घरात लहान बाळाच्या आगमनाने जसे सर्व घर आनंदून जाते तसे आमचे झाले. पुढचे प्रत्येक दिवस रोज नवनवीन फुले उमलू लागली आणि दिवसागणिक ती फुलतंच गेली. काही दिवसातच सर्व झाड सुंदर फुलांनी बहरून गेले. खरेतर आपण फुलझाडे तर रोजच पाहत असतो पण या वेळी आम्ही निसर्गाच्या या चमत्काराचे साक्षीदार होतो.

इतके वर्ष आम्ही या झाडांच्या दुनियेशी पूर्णपणे अनोळखी होतो पण " ताम्हण " ची ओळख झाली आणि आम्हाला नवीन मित्र मिळाल्या सारखे वाटले.
आणखी या फुलांचे वैशिट्य आम्हाला समजले ते म्हणजे ताम्हण हे महाराष्ट्राचे राज्यफुल आहे. त्यामुळे ताम्हण बरोबरचे आमचं नातं अधिकच घट्ट झाले. 

८ टिप्पण्या:

  1. तामण महाराष्ट्राचे राज्य पुष्प आहे

    उत्तर द्याहटवा
  2. Beautifully written...knowledge madhe bhar padali...asech chan chan lihit ja :-)

    उत्तर द्याहटवा
  3. Beautifully written...knowledge madhe bhar padali...asech chan chan lihit ja :-)

    उत्तर द्याहटवा