शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

ब्रह्मे वाडा …

ब्रह्मे वाडा …

अलीकडेच फेसबुकवर आमची बालमैत्रीण कविता ब्रह्मेची भेट झाली आणि माझ्या लहानपणीच्या बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या.

खरेतर आपण वयाने कितीही मोठे झालो आणि नोकरी व्यवसायानिमित्त कितीही दूर गेलो तरी आपले लहानपणाचे दिवस आपण कधीच विसरू शकत नाही. रोजच्या गडबडीत जरी बालपण विसरून गेलो असलो तरी, अशी एखादी घटना अथवा गोष्ट घडते की आपल्या  जुन्या आठवणी एकदम ताज्या होतात.

कविताची फेसबुक वर भेट झाली आणि अशाच मला आमच्या ब्रह्मेवाड्या बद्दलच्या आठवणी ताज्या झाल्या.
मला डोंबिवली सोडून जवळ जवळ 28 -29 वर्षे झाली, पण आमचे घर, आम्ही जेथे राहात होतो तो ब्रह्मे वाडा अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. असे वाटते की अत्ता - आत्तापर्यंत मी तिथेच राहात होतो.

इतर वाड्यांप्रमाणे आमचा वाडा पण एकेकाळी बिऱ्हाडांनी भरलेला होता.वरती स्वतः मालक ब्रह्मे आणि खाली आम्ही आणि रास्वलकर. वाड्याची दुसरी बाजू संतांच्या मालकीची होती.पुढे आणि पाठी छान आंगण आणि नंतर एक बैठी चाळ असे आमच्या वाड्याचे एकंदर रूप. आमच्या एका बाजूला रानडे वाडा आणि एका बाजूला म्हैसकर वाडा, समोर पटवर्धन वाडा आणि मागे रेल्वे लाईन.

आमच्या वाड्यात भरपूर विविध प्रकारची झाडे होती.गेट  मधून  आत  आले की छान जास्वंदाचे  झाड, नंतर सुंदर अनंताचे झाड , आमच्या घरासमोरच प्राजक्ताचे झाड होते.त्याव्यतिरिक्त  तगर, डबल तगर, डबल जास्वंद, रातराणी, मधुमालती, बुचाचे झाड, शेवगा, पेरू, पपई अशी कितीतरी झाडे होती. त्याशिवाय प्रत्येकाच्या घरासमोर गुलाब, मोगरा, अबोली, सोनटक्का, गोकर्ण, गुलबक्षी अशा प्रकारची बरीच फुलझाडे होती. आमची आई रोज पहाटे उठून प्रथम रानड्यांच्या डेअरीतून  दूध  घेऊन यायची आणि नंतर पूजेसाठी फुले तोडून आणायची. रोज सकाळी साडेसात आठच्यासुमारास  ब्रह्मे आजी फुले घ्यायला यायच्या. सकाळी सकाळी दारात पडलेला प्राजक्ताचा सडा, त्याचा तो  हवेत पसरलेला सुगंध त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.
दररोज संध्याकाळी अंगणात सडा घालणे, झाडांना पाणी घालणे, तसेच महिन्यातल्या एखाद्या रविवारी झाडांच्या खालची साफसफाई करून आळी तयार करणे हे माझे अगदी आवडते काम होते.

आम्ही लहान असताना आम्हाला ब्रह्मे आजोबांचा ( त्यांना सर्वजण तात्या म्हणत) एक आदरयुक्त  दरारा  वाटत असे. आम्ही खेळत आसलो आणि तात्या आले की सर्व जण एकदम चिडीचूप होत असत. पण तात्यांची जेव्हढी भीती वाटायची  तेव्हडेच ते खूप प्रेमळही होते.

वाड्यात भरपूर लहान मुले होती. मी, माझा मोठाभाऊ चारुदत्त ( चारू), ब्रह्म्यांची कविता, शिल्पा आणि विक्रांत, शेजारचे अजेय, धनु (धनवंती), पाठीमागे आरती, विवेक ( बाळ्या), गुड्डी ( वृषाली), दंडगे यांच्या मृदुला आणि मृणाल (त्यांना सर्वजण मुद्या आणि मून्या म्हणायचे) अमित गुणे,दीपक आणि ज्योती सरवटे,अशी लहान मोठी कितीतरी बाळगोपाळ मंडळी होती. त्यातल्यात्यात मी, अजेय,आरती आणि कविता आम्ही सामान वयाचे होतो. उन्हाळ्यात आणि दिवाळीच्या सुटीत आम्ही अगदी भातुकलीपासून जरा मोठे झाल्यावर पत्ते, डबा-ऐसपैस, क्रिकेट, लंगडी वगैरे खूप खेळ खेळायचो.ब्रह्म्यांची ग्यालरी ( त्यावेळी त्यांचीच मोट्ठी एल शेप ग्यालरी होती), तसेच जिन्याखालचा चौकोन किंवा एखाद्या झाडाखालची सावली ह्या आमच्या बैठे खेळ खेळण्याच्या आवडत्या जागा होत्या.

आमच्या शेजारच्या वाड्यात एक मोठे पापडीचे झाड होते. उन्हाळ्यात त्याच्या वाळलेल्या पापड्या अंगणात पडायच्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत ह्या पापड्या गोळा करून त्यातल्या बिया आम्ही चवीने खायचो.
मागच्या अंगणात एक शेवग्याचे झाड होते. झाड चांगले मोठे होते पण त्याच्या शेंगा काढणे जरा नाजूक काम होते. मला अजूनही आठवते कि आम्ही मोठे होई पर्यंत ह्या झाडाचा आम्ही पुढे स्टुम्प्स म्हणून वापर करायचो.

माझी आई एका भजनी मंडळाची सभासद होती. आठवड्यातून तीन दिवस दुपारी ब्रह्म्यांच्या घरी भजनांचा क्लास असायचा. लहान असताना अधून-मधून मी आई बरोबर भजनाच्या कार्यक्रमाला जायचो. क्लासच्या सरांचे नाव होते हटकर सर त्यांचा चेहरा जरा रागीट होता. मला त्यांची खूप भीती वाटायची.

आमच्या सर्वांच्या शाळा वेगवेगळ्या होत्या, मी, चारू जोशी हायस्कुल, अजेय साऊथ इंडियन शाळा, कविता - शिल्पा - गांधी विद्यालय, विक्रांत टिळक नगर तर आरती ठाण्याच्या मंगला विद्यालय मध्ये.तीस-पस्तीस वर्षापूर्वीसुद्धा डोंबिवलीच्या लोकसंख्येच्या मानाने शाळा मात्र भरपूर आणि चांगल्या होत्या.

आमच्या वाड्याच्या मागून रेल्वे-लाईन गेली होती. लहान असताना येणाऱ्या-जाणाऱ्या लोकल गाडयांना टाटा करणे इथपासून ते जरा मोठे झाल्यावर रेल्वेरूळांवर चपटी पट्टी होण्यासाठी दहा पैशाचे नाणे ठेवणे, मालगाड्यांवर दगड मारणे अशी कितीतरी मजा मस्ती आम्ही मुलांनी केली. मला अजूनही आठवते जेव्हा मुंबई- पुणे डबल डेकर सिंहगड एक्सप्रेस गाडीचे उदघाटन झाले आम्हीच आजूबाजूच्या वाड्यातील मुले गाडीचे स्वागत आणि टाटा करायला तासापेक्षा जास्तवेळ वाट पाहत होतो.

दिवाळीच्या सुट्टीतील मजा तर आणखीनच वेगळी होती. त्यावेळी फटाके आणले की ते उन्हात वाळविण्याची पद्धत होती. फटाके चांगले कडकडीत वळले की चांगले वाजायचे. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही किल्ला करायचो. त्यासाठी दगड- माती गोळा करणे. खेळणी आणणे, किल्ल्याची राखण करणे आणि शेवटी त्यात बॉम्ब ठेऊन किल्ला मोडणे ह्या प्रत्येक गोष्टीतील मजा काही वेगळीच होती.

नकळत लहानपण निघून गेले, काळाबरोबर पुढे शिक्षणानिमित्त, कोणी नोकरीनिमित्त आम्ही सगळे जण एकमेकांपासून दूर गेलो.

कविता फेसबुक वर भेटली आणि जुन्या आठवणी परत जाग्या झाल्या.

माझा जुना पत्ता आठवला, जो आता परत कधीच असणार नाही ....

हेमंत पुरोहित,
ब्रह्मे बंगला, म. गांधी रोड,
विष्णूनगर,

डोंबिवली  ( पश्चिम